E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
Wrutuja pandharpure
31 May 2025
अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा समोर आला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या मुख्य सल्लागार पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांचा राजीनामा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. ट्रम्प दुसर्यांदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्यापासून मस्क यांनी त्यांची पाठराखण केली होती. त्यांच्यासाठी ते प्रचाराच्या मैदानातही उतरले होते. त्याची बूज राखत ट्रम्प यांनी सत्ता स्थापनेनंतर मस्क यांच्याकडे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी (डॉज) विभागाची जबाबदारीही सोपवली होती. ट्रम्प आणि मस्क यांच्या संबंधातील चढउतार गेल्या दहा वर्षांपासूनचे आहेत. कट्टर विरोधक ते घट्ट मैत्री असे त्यांच्या संबंधाचे स्वरूप राहिले आहे. प्रारंभी ट्रम्प यांच्यावर कठोर टीका करणारे मस्क हे अलीकडच्या काळात त्यांचे समर्थक आणि प्रशंसक बनले होते; मात्र ट्रम्प यांच्या लहरीपणातून घेतल्या गेलेल्या निर्णयाची झळ मस्क यांनाही बसू लागल्यानंतर त्यांच्यातील दुरावा वाढत गेला. २०१६ मध्ये ट्रम्प पहिल्यांदा अध्यक्षपदाचे उमेदवार होते, तेव्हा मस्क यांना ते अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार वाटत नव्हते; मात्र त्यांचे ते मत ट्रम्प पहिल्यांदा निवडून आल्यानंतर एकदम बदलले; एवढेच नाही, तर त्यांच्यातील संबंध एवढे घट्ट झाले, की मस्क यांची नेमणूक ट्रम्प यांनी आर्थिक सल्लागार परिषदेवर केली. २०१७ मध्ये ट्रम्प यांनी पॅरीस करार रद्द करण्याचा घेतलेला निर्णय न पटल्याने मस्क यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पाच वर्षांनी खुद्द ट्रम्प हेच मस्क यांची प्रशंसा करू लागले. मस्क हे जगातील सर्वांत महान प्रतिभा संपन्न व्यक्तींपैकी एक असल्याचा साक्षात्कार ट्रम्प यांना झाला. अवघ्या सहा महिन्यांतच काहीशा मतभेदानंतर ट्रम्प यांनी मस्क यांची संभावना ‘एक बकवास व्यक्ती’ असा केला. २०२२ मध्ये ट्विटरची (सध्याचे एक्स) मालकी मस्क यांच्याकडे आल्यानंतर बंदी घालण्यात आलेले ट्रम्प यांचे खाते मस्क यांनी त्यांना पुन्हा बहाल केले. २०२३ पासून मस्क यांनी पुन्हा ट्रम्प यांचे समर्थन उघडपणे सुरू केले. २०२४ च्या निवडणुकीत तर ट्रम्प यांच्या प्रचाराची धुराच मस्क यांनी सांभाळली होती. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर मित्र आणि सल्लागार अशा दुहेरी नात्यांनी मस्क काम करीत होते.अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांनी स्वत:ची मनमानी करीत वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. आयातीवरील प्रत्त्युत्तर शुल्काबद्दल न्यायालयाने त्यांची कानउघाडणीही केली आहे.
टेस्ला अडचणीत
मस्क यांच्या मैत्रीला जागून ट्रम्प यांनी त्यांना ‘डॉज’चे प्रमुख केले. सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि अनावश्यक योजनांना कात्री लावणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे. ट्रम्प यांनी आणलेल्या काही विधेयकांवरून त्यांच्यात मतभेद सुरू झाले. ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी (बिग अँड ब्यूटीफुल) कर सवलतीच्या विधेयकावरुन मस्क यांनी टीका केली होती. त्यामुळे सरकारी खर्च वाढेल, अशी भीती मस्क यांना वाटत होती. त्यांच्यातील मतभेद वाढले होते. मस्क हे रिपब्लिकन पक्षाचे सर्वात मोठे देणगीदार आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे २५० दशलक्ष डॉलरची देणगी पक्षाला दिली. या देणगीमुळेच ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संबंध मधुर झाले होते; मात्र याच काळात टेस्लाच्या नफ्यात मोठी घट झाली होती. अमेरिकेच्या सरकारमध्ये काम करण्याच्या काळात मस्क यांचे त्यांच्या टेस्ला कंपनीकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार त्यांच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. मस्क यांनी टेस्ला किंवा ट्रम्प यांच्यापैकी एकाची निवड करावी, असे गुंतवणूकदारांनी म्हटले होते. टेस्लाची विक्री कमी झाली होती आणि शेअर्सही कोसळले होते. ट्रम्प यांच्या धोरणात्मक आणि अकस्मात घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रशासनात नाराजी आहे. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय किंवा सल्लामसलतीशिवाय निर्णय घेणे हे ट्रम्प यांचे वैशिष्ट्य आहे. भारत आणि पाकिस्तानातील संघर्षबंदी अमेरिकेच्या मध्यस्थीने झाल्याचा ट्रम्प यांचा दावाही भारताने फोल ठरवला आहे. भारत-पाकिस्तानमधील चर्चेत तिसर्या देशाची मध्यस्थी नाही, ही भारताची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. अचानक निर्णय घेऊन विरोधकांना गोंधळात टाकायचे आणि सोयीस्करपणे माघारही घ्यायची यातून त्यांचा अहंकारच दिसून येतो. मस्क यांनी ट्रम्प यांच्यापासून फारकत घेऊन ट्रम्प यांचा हा चेहरा उघडा पाडला आहे.
Related
Articles
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक